Wednesday, December 02, 2009

रिमझिमचा बाबा



हल्ली त्याला सकाळी पाच वाजता अलार्म न लावताही जाग येतेच. मग जॉगिंग. आणि परत येताना दूध, कधी ब्रेड, वर्तमानपत्र, वगैरे. किचनच्या व्हाइट बोर्डवर लिहून ठेवलेले पदार्थ म्हणजे स्प्राऊट्स, काकडी, कोिशबीर करण्यासाठी तोडून व स्वच्छ धुऊन ठेवलेले पालक त्याने फ्रिजमधून बाहेर काढले. दूध गरम करायला ठेवलं. पालक चिरायला सुरुवात करण्यापूर्वी एकदा बेडरूममध्ये डोकावून घेतलं. रिमझिम अजूनही गाढ झोपलेली होती. म्हणजे अजून अर्धा तास झोपणार आहे बछडी. ती उठण्यापूर्वी पालक पराठे, काकडीची दही कोिशबीर आणि मोड आलेलं कडधान्य घालून सलाद करून तिचा शाळेचा डबा पॅक व्हायला हवा.



कारण काल तिच्या मिसने डायरीत लिहून दिल्याप्रमाणे आज हाच मेनू असणार होता. शाळेचा डबा भरता -भरता वाजलेल्या शिळेत कुकरच्या शिट्टीचाही आवाज मिसळला. शाळेत वरण-भात द्यायचा नसला तरी तो तिच्या पाळणाघरातल्या डब्यात वरण-भात नक्कीच भरतो. कुकरच्या शिट्टीच्या आवाजाने रिमझिम मात्र दचकून उठते. मग त्याला धावतच बेडरूमकडे जावं लागतं, नाहीतर रिमझिम रडायला लागते. जागं झाल्यावर तो समोर दिसला नाही की मग तिचा मूड जातो. आणि मग तिला दूध पाजणं, ब्रश, शी, आंघोळ करून तयार होण्यात तिचा प्रत्येक कामात असहकार असतो. मग शाळेला उशीर आणि तिच्या ‘मिस’चे डोळे वटारून बघणं.. त्यापेक्षा तिने डोळे उघडायच्या आत तिला दर्शन द्यावं, हेच उत्तम!

‘गुड मॉर्निग पिल्ला!’ त्याने लाडात तिला आडवीच दोन्ही हातांत उचलून घेतली. कपाळाची पापी घेतली आणि हवेत हळुवार झोके देत किचनमध्ये आणलं. काही बोलत नाहीये म्हणजे पुरती जागी झालेली नाहीये अद्याप. मग त्याने किचनच्या ओटय़ावर ग्रेनाइटला एके ठिकाणी हात लावून अंदाज घेतला. कधी कधी गरम भांडे जर थोडय़ा वेळापूर्वी तिथे ठेवलेलं असलं तर तेवढीच जागा गरम होते. किंवा रात्री खूप थंडी पडलेली असली तर ग्रेनाइट थंड होतो. त्यावर जर रिमझिमला बसवलं तर मग भोकाड पसरायला पुन्हा एक कारण. म्हणून मग ओटय़ावर जिथे कुठे बसवायचं असतं तिथे तो आसन घालतो आणि त्यावर तिला बसवतो. आज आसन घालायची गरज नव्हती.

ओटय़ावर पेंगुळलेल्या रिमझिमला पोटाशी धरत त्याने गरम करून थंड केलेल्या दुधाचा ग्लास तिच्या तोंडाला लावला. तर दूध तोंडात ओढायचाही तिला आळस. ‘हां.. आता हे दूध पिऊन रिम्मी कश्शी होनाल? श्त्राँऽऽग!’ म्हणत त्याने तिच्या पाठीवर थपथपवलं. आता कुठे तिने हळूहळू दूध ओढायला सुरुवात केली. तिच्या कलाकलाने घेत घेतच हळूहळू एकेक कामं उरकायची आता त्याला सवय झाली आहे. दूध पिऊन झाल्यावर तिला शी करायला बसवलं की तो तिच्या आंघोळीच्या तयारीला लागेल. इस्त्री केलेला तिचा शाळेचा ड्रेस काढून ठेवेल. तिची शाळेची बॅग, त्यातला पेन्सिल बॉक्स पेन्सिल शार्पन करून वगैरे नीट भरून ठेवेल. तेवढय़ात रिमझिमची हाक येईल- ‘बाबा.. झाली.’ मग तिचं ढुंगण धुऊन दिलं की आंघोळ. आंघोळ करता करताच ब्रश. खरं तर सुट्टीच्या दिवशी हे सर्व तो तिलाच करायला लावतो. आताशा तिला जमतंही, पण वेळ लावते.

‘आता पुढच्या वर्षी पिल्ला कितवीत जानाल?’

‘के जी टू!’ रिमझिमचं गणित पक्कं!

‘हां.. म्हणजे ती अजून मोठ्ठी होनाल. हो की नई?’

‘मग ती सोता शी धुनार, ब्रश करणार नि आंघोळ करणार!’

‘मी करते आंघोळ, तू जा..’ रिमझिमने फर्मान सोडलं. तिला पाण्याशी खेळायला आवडतं. पण ते सुट्टीच्या दिवशी ठीक आहे. ‘आज नाही. संडेला.’

‘नाही आजच.’ रिमझिम हट्टालाच पेटली.

त्याने तिला थोडी दमदाटी केली. तिची जरा रडारडी झाली. पण एकदा त्याने तिला मऊ टॉवेलमध्ये डोक्यापासून गुंडाळल्यावर आणि तिची ‘बाहुली’ बनवल्यावर ती पुन्हा मूडमध्ये आली. याचाच फायदा घेत त्याने तिला पटापट तयार केलं. एका हातात शाळेचा टिफिन, पाळणाघराचा टिफिन, स्कूलबॅग धरली आणि एका कडेवर तिला- असं करत पायऱ्या उतरतच तो खाली आला. दारासमोर रांगोळी घालत बसलेल्या देशमुखकाकूंचा रोजप्रमाणे सामनाही झाला. पुन्हा तोच डोस मिळाला..

‘एका हातात तीन-चार बॅगा, एका हातात पोर. एवढी सर्कस सांभाळत पायऱ्यांनी खाली उतरताय! पायबीय घसरला तर पडेल की लेकरू! त्यापेक्षा लिफ्टच वापरत जा. मूल सांभाळणं, वाढवणं म्हणजे सोप्पं काम नव्हे.’ यावर रिमझिमचं तोंडावर हात ठेवून हसणंही झालं. कारजवळ पोचताच रिमझिमला बॉनेटवर बसवून गाडीचं दार उघडून त्याने आधी सगळ्या बॅग्ज मागच्या सीटवर ठेवल्या. मग तिला सीटवर बसवत तिचा सीट-बेल्ट लावला आणि मग स्वत:चा. रिमझिम आल्यापासून प्रत्येकच कामात तो सावधगिरी बाळगायला लागला आहे. जरा संथ, पण जबाबदार. बाप-लेक शाळेला निघालीत. वाटेत त्याच्या मोबाईलवर आलेले क्लाएंटचे कॉल्स त्याने उचलले नाहीत. रिमझिमशी बोलत बरोबर आठ वाजता त्यांनी शाळा गाठली.

घरी परतताना वाटेत तिच्या पाळणाघरात डबा, दूध, फळं आणि बदलायचे कपडे ठेवून त्याला साठेआठपर्यंत घरी पोचायचं होतं. कारण घरी शांताबाई आल्या असतील. त्या घरातली धुणी-भांडी, स्वच्छता वगैरे कामं आटपतील. त्याला दहा वाजता ऑफिस गाठायचं असतं. कधी कधी साइटवर जावं लागतं म्हणून मग त्याने रिमझिमला शाळेतून पाळणाघरात पोचवायला रिक्षा लावली आहे. दररोज १२ वाजता रिक्षावाला तिला घ्यायला गेला की नाही, वगैरे सगळ्याचा तो व्यवस्थित फॉलोअपही ठेवतो. पाळणाघरातून मात्र तोच तिला घरी आणत असतो.

संध्याकाळी सहा वाजता रिमझिमला घरी आणताना तिने शाळेतल्या डायरीत ‘मिस’ने लिहून दिलेला मेसेज त्याला दाखवला.. ‘येत्या शनिवारी पालक-शिक्षक भेटीत इतर सर्व नेहमीच्या चर्चासोबतच मिसेस भावे यांचं ‘बालमानसशास्त्र’ या विषयावर एक बौद्धिकही होणार आहे.’

समोर आलेल्या सायकलवाल्याकडे त्याचं दुर्लक्ष झालं. मग भानावर येणं आणि नंतर करकचून ब्रेक दाबणं.

बाऽऽपरे!..

मिसेस भावे. खडूस म्हातारी..

काय म्हणाली होती?

‘मी तुम्हाला गर्ल चाइल्ड देऊ शकत नाही अ‍ॅडॉप्ट करायला. फॉस्टर पॅरेंट अन् त्यातही मेल! इथे सख्ख्या बापाचा भरवसा नसतो. आणि तुमचा..?’

‘माझा का नाही भरवसा वाटत मॅडम? असं काय केलं मी?’

‘आधी लग्न करा तुमच्या त्या- लिव्ह इन् पार्टनरशी. बाळाला आई नको?’

‘अर्पिता तिची चांगली आई होईल की! पण त्यासाठी लग्नच कशाला करायला हवं? कायदा..’

‘कायदाबियदा मला सांगू नका, मिस्टर.. व्हू सो एव्हर यू आर.. त्या दिवशी टीव्हीवर पाहिलीत ना बातमी- तो माणूस स्वत:च्या मुलीला सेक्श्युअली अब्यूज करीत होता..’

‘त्याला लग्नाची बायको आणि मुलीला आई असूनसुद्धा!’ त्याने युक्तिवाद केला.

‘मला शिकवताय? निघा.. निघा इथून.’

काय चिडली होती बाई! हाकलूनच लावलं आपल्याला.

नंतर अर्पिताही निघून गेली- यू.एस.ला एका प्रोजेक्टवर. आणि मग पुन्हा.. मैं और मेरी तनहाई. म्हटलं तर तनहाई, म्हटलं तर चीटचॅटिंग. भौगोलिक अंतराने आता काही फार फरक पडत नाही, असं स्वत:ला समजावत असताना अचानकच मग भावेंच्या अनाथालयातून फोन आला अ‍ॅडॉप्शनच्या फॉरमॅलिटीज् पूर्ण करण्यासाठी. आणि ही रिमझिम बरसात सुरू झाली आपल्या आयुष्यात. इवल्या इवल्या पावलांनी, पण संततधार बहार आली. जगण्याचे संदर्भच बदलले. आणि किती बदललो आपण! आंतर्बाहय़!

त्याने कौतुकाने रिमझिमकडे पाहिलं. ती त्याच्याकडे आश्चर्याने पाहत होती.

‘आज काय झालं तुला? अर्पिताची आठवण आली? तिला फोन करायचा हा. आत्ता नको. ती झोपलेली असेल. तिकडे आता रात्र असते ना. आणि उठल्यावर तिला खूप कामं असतात. आणि समर व्हेकेशनमध्ये ती येणारे ना आपल्याकडे? आता समर व्हेकेशनला फॉट्टी टू डेज उरलेत. आणि त्यानंतर फिफ्टी सिक्स डेज ती राहणारे ना आपल्यासोबत?’ रिमझिमचा समंजस सल्ला. हे सगळं तोच तिला सांगत असतो.. ती अर्पितासोबत आत्ताच्या आत्ता बोलायचा हट्ट करते तेव्हा. अनेकदा तिच्यात आणि अर्पितामध्येच ठरतं- सुट्टय़ांमध्ये काय करायचं. मग त्याला कळतं. फाईन!

‘हो गंऽऽ माय माझे,’ म्हणत त्याने बंद पडलेली कार चावी फिरवून परत सुरू केली.

शनिवारी सकाळी दोन्ही हात कमरेवर ठेवत तो आरशासमोर उभा राहिला. स्वत:ला काळजीपूर्वक न्याहाळलं. ‘आपला चेहरा काय साला चाइल्ड अब्यूजरसारखा दिसतो काय?’ क्लीन शेव केलेली दाढी खाजवत तो स्वत:शीच बोलला.

‘ते काही कोणाच्या चेहऱ्यावर लिहिलेलं नसतं मिस्टर..’

या मिसेस भावेंना फेस करायचं म्हणजे..!

पालकसभा सुरू असताना मध्येच रिमझिम प्ले-ग्राऊंडवरून खेळून दमलेली त्याच्याजवळ आली. मिसेस भावेंचं भाषण संपेस्तोवर ती त्याच्या मांडीवर गाढ झोपलीसुद्धा.

तो बॅगा खांद्यावर लटकवून आणि दुसऱ्या खांद्यावर रिमझिमचं डोकं तिची झोपमोड न होता ठेवत उठला, तर मिसेस भावे समोर दत्त म्हणून उभ्या! नमस्कार चमत्कार झाल्यावर याला वाटलं विचारावं- आपल्या पालक पिता म्हणून प्रगतीपुस्तकावर भावेबाईंनी काय शेरा मारलाय तो!

तो त्याच म्हणाल्या, ‘तुम्ही पुन्हा कधी आला नाहीत भेटायला. विचारायला- की मी ही तीन महिन्यांची मुलगी कशी काय तुम्हाला दिली ते?’

रिमझिमच्या पाठीवरच्या पंजाची प्रश्नार्थक मुद्रा करीत तो म्हणाला, ‘तशी तुमच्या अनाथालयातल्या सोशल वर्कर्स येतच असतात- रेग्युलरली रिपोर्ट घ्यायला. त्यांना विचारायचो सुरुवातीला आडून आडून. पण तुम्हीच सांगाल तर बरं.’

‘तुम्ही या मुलीकरिता माझ्याशी भांडून गेलात ना, तो माझ्या आयुष्यातला उत्क्रांतीचा एक टप्पा होता. म्हटलं, विश्वासावर जग चालतं. ठेवून बघावा विश्वास. आपले काही मेंटल ब्लॉक्स असे असतात ना! भरल्या कुटुंबातच मुलगा वा मुलगी सुरक्षित असते, हाही एक. तुमचा मुद्दा बरोबर होता. विकृत नवऱ्याला विरोध करण्याची साधी ताकद नसते या बायकांत. डिस्गस्टिंग..’

‘मॅडम, असू द्यात.’

‘आमचा विश्वास सार्थ ठरवलात तुम्ही. शी इज व्हेरी कम्फर्टेबल विथ यू.’

‘थँक्स.’ त्याच्या बोलण्यात औपचारिक कोरडेपणा होता.

‘एक ब्रॉशर काढतोय आपण संस्थेचं. तुम्ही आमचे रोल मॉडेल आहात. तुमच्याबद्दल त्यात मेन्शन करावं म्हणते. काय.. मिस्टर.. हल्ली नावंच नीट आठवत नाहीत बघा.’

‘मॅडम, प्लीज.. आपण ‘बाप’गिरी करू शकतो, हा शोध अर्पितासोबत जगताना अगदी सहज लागलेला. तुमच्याकडे ही गर्ल चाइल्ड एक किडनी नसलेली होती, त्यामुळे तिला कोणी प्रीफर करीत नव्हतं. म्हणून मी भाग्यवान ठरलो, इतकंच. पण पब्लिसिटीसाठी माझी परवानगी नाही. सॉरी.’

‘ओ.के. मिस्टर..’

‘‘रिमझिमचा बाबा’ म्हटलेलं चालेल मला.’

‘नॉट ओन्ली बाबा- अ वर्थव्हाइल बाबा..’ म्हणत मिसेस भावे दिलखुलास हसायला लागल्या. त्याने तोंडाचा चंबू केला. त्यावर बोट ठेवत ‘शूऽऽऽ’ असा आवाज केला. कारण झोपलेल्या रिमझिमला असंच जपत तो आता घरी नेणार होता.

No comments:

Post a Comment