काल भांडण झालं घरात. कारण किरकोळच. पण भांडण झालं खरं... कसं झालं, का झालं, कोणाची चूक होती याला काही अर्थ नाही... पण खरं सांगू, अगदी मनातलं? मजा आली. नेहमीचं तेच तेच जगण्याला असं काही झालं की अर्थ येतो. नाहीतर तीच बायको आणि तोच नवरा...
हो भांडण आमचं नवरा-बायकोचं झालं. तसं फार काही जगावेगळं घडलं नाही. चारचौघांमध्ये घडतं तसंच... चूक तिची का माझी... हा तर मोठ्या संशोधनाचा विषय आहे. आपण विनाकारण भांडलो नाही तर जगाचं पुढे चालायचं कसं...?
लव्हमॅरेज झालेल्यांबाबत काहीतरी वेगळं असेल, त्यांच्या भांडणाला काहीतरी कारण असेल, असं मला उगाचंच वाटत होतं. पण त्या बाजूलाही तीच कथा. न राहवून त्यांच्याकडं चौकशी केली. त्यात वेगळंच निघालं. "तू मला शिकवू नकोस, मी तुला कॉलेजपासून ओळखतेय किंवा ओळखतोय', अशी त्यांच्या भांडणाची सुरवात असते. ऍरेंज मॅरेजमध्ये हे बोलायचा चान्स नसतो. म्हणून त्या बाजूची भांडणं लव्हमॅरेजवाल्यांसारखी दमदार होत नाहीत. लव्हमॅरेजवाल्यांना कसा आधीच्या काही वर्षांचा रेफरन्स असतो, त्या काळात झालेल्या चुका पुन्हा पुन्हा उगाळायला मिळतात (उगाच सांगू नकोस, मला माहितेय त्या फर्स्ट इअरमधल्या ...वर तू आधी लाइन मारत होतास... वगैरे वगैरे) ती व्यवस्था ऍरेंजवाल्यांसाठी नाही.
या झाल्या भांडणाऱ्यांच्या दोन बाजू. पण याहीपेक्षा वेगळ्या बाजू आहेत. पहिलं भांडण नेहमीचं... कडाक्याचं. दुसरा प्रकार मात्र फार धोकादायक आहे. तो प्रकार म्हणजे अबोला... अर्थातच पुरुषांसाठी धोकादायक असलेला अबोला... अगदी व. पु. काळ्यांनीही या गोष्टीवर लिहून झालं आहे. अबोला हे बायकांकडचं ब्रह्मास्र आहे. त्यांनी ते उगारलं, की भले भले नवरे चिडीचूप होतात. त्यांचं काहीही चालत नाही. बरं, समजूत काढायला गेलो, की "आता कशाला लाडीगोडी लावताय? आधी कसंही वागायचं, नंतर लाडीगोडी लावायची... तुम्हाला तेवढंच जमतं,' अशी उत्तरं तयार असतात. आता अशा युक्तिवादांपुढे काय डोकं फोडणार? पण हे असंच चालतं म्हणूनच भलेभले गपगार होतात. ज्यांनी अनुभव घेतलाय त्यांना पटत असेल हे. (लग्न झालेले बहुतेक सगळे हा अनुभव घेतातच) आता हे सारं उगाळायचं कारण लक्षात आलंच असेल. आमच्याकडे अबोलाच होता. देवाच्या दयेने तो लवकर आणि थोडक्यात संपला. थोडक्यात म्हणजे एक कॅडबरी आणि आइस्क्रीमवर निभावलं. माझ्या शेजाऱ्याला असा अबोला साडी, बाहेर जेवण आणि पाच दिवसांचं माहेरपण एवढ्याला पडला होता...
म्हणूनच मी फार थोडक्यावर निभावलो म्हणायचं. सगळेच नशीबवान असतात असं नाही. असतात एकेकाचे भोग... भोगावेच लागतात!
No comments:
Post a Comment